कोवाड येथे नुतन जि.प. व पंचायत समिती सदस्यांचा महिलांतर्फे जाहीर सत्कार
कोवाड येथे नुतन जि.प. व पंचायत समिती सदस्यांचा महिलांतर्फे जाहीर सत्कार

कोवाड ता. चंदगड येथे नुतन जिल्हा परिषद सदस्या कु. मानसी कल्लापा भोगण व नुतन पंचायत समिती सदस्या सौ. सुवर्णा कुंभार यांचा आज कोवाड गावातील महिलांच्या वतीने हनुमान मंदिर येथे जाहीर सत्कार सभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. महिलांच्या स्नेहपूर्ण उपस्थितीने व आनंदी वातावरणामुळे हा कार्यक्रम भावनिक व प्रेरणादायी ठरला.
या सत्कारप्रसंगी बोलताना कु. मानसी भोगण म्हणाल्या, “कोवाडसह संपूर्ण मतदारसंघातील जनतेने दाखवलेल्या प्रेमामुळेच आज मी जिल्हा परिषद सदस्य होऊ शकले. हा केवळ माझा विजय नसून तुमच्या विश्वासाचा विजय आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासोबतच चंदगड तालुक्याचा विकास कसा साधता येईल, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन.”
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पारदर्शक व लोकाभिमुख कामकाज करण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना नुतन पंचायत समिती सदस्या सौ. सुवर्णा कुंभार म्हणाल्या, “आपण माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले आहे. या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही. महिलांच्या सर्व योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवून त्या प्रभावीपणे राबविण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.” महिलांचे सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण व स्वयंरोजगार यासाठी विशेष लक्ष दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी दिव्या बेल्लद व दिपाली धर्माजी यांनी मनोगत व्यक्त करताना दोन्ही नुतन लोकप्रतिनिधींकडून महिलांना न्याय मिळेल, विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. महिलांनी फुलांनी, ओवाळणीने व टाळ्यांच्या गजरात नुतन लोकप्रतिनिधींचे स्वागत करून आपला आनंद व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्या राजगोळकर यांनी प्रभावीपणे केले. या सत्कार सभारंभातून महिलांचा लोकशाही प्रक्रियेतील सहभाग, नेतृत्वावरील विश्वास आणि विकासाबाबतच्या अपेक्षा स्पष्टपणे दिसून आल्या. कोवाड गावातील महिलांसाठी हा क्षण अभिमानाचा व प्रेरणादायी ठरला.





