चंदगड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाला सुरुवात
चंदगड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाला सुरुवात

-
चंदगड तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानाला सुरुवातचंदगड प्रतिनिधी :
चंदगड तालुक्यातील सर्व मंडळांमधील नागरिकांच्या विविध महसुली व प्रशासकीय अडचणी जागेवर सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान टप्पा क्रमांक १ आयोजित करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तालुक्यातील विविध ठिकाणी नियोजित तारखांना शिबिरे भरविण्यात येणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील कार्यालय चंदगड व तहसिलदार राजेश चव्हाण यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत शनिवार, ७ मार्च २०२६ रोजी कोवाड येथील श्री मंगल कार्यालय (नेसरी रोड) येथे पहिले शिबिर होणार आहे. त्यानंतर १४ मार्च रोजी तुर्केवाडी येथील श्री ब्रम्हलिंग मंदिर, १० एप्रिल रोजी माणगाव मंडळातील सातेरी देवी मंदिर हॉल (ढोलगरवाडी), १७ एप्रिल रोजी नागनवाडी, बागीलगे व डुक्करवाडी येथील विद्यालय व ज्युनिअर कॉलेज परिसरात, ८ मे रोजी हेरे येथील सह्याद्री विद्यालयात तर १५ मे रोजी तहसील कार्यालय चंदगड येथील ऑडिटोरियम मिटिंग हॉलमध्ये शिबीर पार पडणार आहे.
या शिबिरांमध्ये महसूल विभागासह इतर शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांच्या विविध समस्या तत्काळ सोडविणार आहेत. शासनाच्या तरतुदीनुसार भूगोटा वर्ग दोन जमिनी भूगोटा वर्ग एकमध्ये परावर्तित करून दुरुस्त सातबारा देणे, ‘जिवंत सातबारा’ मोहिमेअंतर्गत प्रलंबित नोंदी अद्ययावत करून अभिलेख अर्जदारांना उपलब्ध करून देणे, तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजनांतील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज शिबिरापूर्वी स्वीकारून मंजुरी व आदेश वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
याशिवाय तुकडेबंदी कायद्याविरुद्ध झालेल्या जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांची व हस्तांतरणाची गावनिहाय यादी तयार करणे, विविध प्रकारच्या फेरफार नोंदी अद्ययावत करून सातबारा वाटप करणे, शाळांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना प्रलंबित दाखले देणे, पाणंद रस्ते खुले करणे, प्रलंबित फेरफार निकाली काढणे तसेच लोकसेवा हक्क कायद्याबाबत मार्गदर्शन करणे अशा विविध प्रशासकीय कामांचा या शिबिरात समावेश असणार आहे. हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तलाठी , सर्व मंडळ अधिकारी प्रयत्न करत असुन
त्यामुळे चंदगड तालुक्यातील सर्व बंधू-भगिनींनी नियोजित ठिकाणी व तारखांना उपस्थित राहून शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार राजेश चव्हाण यांनी केले आहे.




