राष्ट्रीय

आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरल्याशिवाय यशस्वी व्यावसायिक करिअर शक्य नाही – संजय नांदवडेकर

र. भा. माडखोलकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आयुष्य घडवणारे प्रेरणादायी व्याख्यान

चंदगड | प्रतिनिधी

आजच्या जागतिकीकरणाच्या आणि डिजिटल परिवर्तनाच्या युगात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नसून, आधुनिक तंत्रज्ञानाशी स्वतःला सतत जोडून ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. बदल स्वीकारण्याची तयारी, नवे कौशल्य आत्मसात करण्याची जिद्द आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती जोपासली, तर कोणतेही व्यावसायिक शिखर गाठता येते, असे प्रतिपादन इनवेशिया हेल्थकेअर, मुंबई येथील मुख्य माहिती अधिकारी संजय नांदवडेकर यांनी केले.
ते चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने “व्यावसायिक करिअरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचे योगदान” या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आपल्या भाषणात संजय नांदवडेकर यांनी केवळ तांत्रिक माहिती देऊन न थांबता, स्वतःच्या जीवनातील संघर्ष, अडचणी, अपयश आणि त्या अपयशांवर मात करत केलेला प्रवास अत्यंत ओघवत्या व प्रभावी भाषेत उलगडून सांगितला. ग्रामीण परिस्थितीतून शिक्षण घेत असताना आलेल्या मर्यादा, साधनांची कमतरता, अनेक वेळा आलेली निराशा आणि तरीही जिद्द न सोडता स्वतःवर विश्वास ठेवत केलेली वाटचाल त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली. यश एका रात्रीत मिळत नाही, तर त्यामागे सातत्य, प्रामाणिक मेहनत आणि स्वतःला सतत घडवत राहण्याची प्रक्रिया असते, हे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले.
आजचे जग तंत्रज्ञानाभोवती फिरत असून व्यवसाय, उद्योग, आरोग्य, शिक्षण, प्रशासन अशा प्रत्येक क्षेत्रात डिजिटल कौशल्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील बदलांची जाणीव करून दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा अ‍ॅनालिटिक्स, ऑटोमेशन, सायबर सुरक्षा यांसारख्या नव्या संकल्पना केवळ ऐकून न घेता त्यांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबरोबरच स्वतःची कौशल्ये विकसित करण्यावर भर दिला, तर रोजगाराच्या संधी आपोआप उपलब्ध होतील, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपल्या करिअरच्या प्रवासात आलेल्या अडचणी सांगताना नांदवडेकर यांनी विद्यार्थ्यांना भावनिक साद घातली. अनेक वेळा अपयश आले, अपेक्षित यश मिळाले नाही, तरीही त्या क्षणी खचून न जाता पुन्हा उभे राहण्याची ताकदच माणसाला मोठे बनवते, असे ते म्हणाले. आयुष्यात संघर्ष टाळता येत नाही; मात्र संघर्षालाच आपला गुरू मानून पुढे गेल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला.
विद्यार्थ्यांनी स्वतःची स्वप्ने मोठी ठेवावीत, मात्र त्या स्वप्नांसाठी आवश्यक असणारी मेहनत, शिस्त आणि चिकाटीही तितकीच मोठी असावी, असा सल्ला त्यांनी दिला. करिअर घडवताना केवळ नोकरीचा विचार न करता समाजाला काय देऊ शकतो, याचाही विचार करणे आवश्यक आहे, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक भान जपण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी संपूर्ण सभागृहात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
व्याख्यानानंतर झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी करिअर निवड, तंत्रज्ञानातील संधी, कौशल्य विकास आणि भविष्यातील व्यावसायिक वाटचाल याबाबत विविध प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नाला संयमाने, सखोल विचारपूर्वक आणि प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे उत्तरे देत नांदवडेकर यांनी विद्यार्थ्यांना अधिकच प्रेरित केले. यावेळी संस्थेचे संचालक व ऑडिटर ऍडव्होकेट एन एस पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रा.आर. पी. पाटील होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मूळ संदर्भांचा अभ्यास करून भक्कम मूलभूत ज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व सांगितले. तंत्रज्ञान महत्त्वाचे असले तरी त्याची मजबूत पायाभरणी मूलभूत ज्ञानावरच उभी राहते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास संस्थेचे संचालक व ऑडिटर प्रा ॲड. एन. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी प्रभारी प्राचार्य एस. डी. गोरल यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. टी. ए. कांबळे यांनी केले, तर प्रा. व्ही. के. गावडे यांनी आभार मानले.
या प्रेरणादायी व्याख्यानाला प्राध्यापक आर. एस. पाटील, प्रा.श्रीनिवास पाटील, डॉ. जी. वाय. कांबळे, प्रा.आर. व्ही. आजरेकर यांच्यासह महाविद्यालयातील संगणक शास्त्र विभागाकडील बहुसंख्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा देणारा आणि आत्मविश्वास निर्माण करणारा हा कार्यक्रम चंदगडच्या शैक्षणिक जीवनात निश्चितच स्मरणीय ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two + four =

Back to top button