वाहतूक नियम पाळले तरच अपघातांना आळा — आरटीओ चंद्रकांत माने
वाहतूक नियम पाळले तरच अपघातांना आळा — आरटीओ चंद्रकांत माने

चंदगड प्रतिनिधी
चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेज येथे श्री देव रवळनाथ मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या वतीने रस्ते वाहन अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित वाहनचालनेबाबत आयोजित जनजागृती कार्यशाळेत प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) श्री. चंद्रकांत माने यांनी विद्यार्थ्यांना सखोल व मार्गदर्शक मार्गदर्शन केले.
आरटीओ माने म्हणाले की, भारतात होणाऱ्या बहुतांश रस्ते अपघातांचे मुख्य कारण मानवी निष्काळजीपणा असून वेगमर्यादा ओलांडणे, हेल्मेट व सीट बेल्ट न वापरणे, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणे ही प्रमुख कारणे आहेत. वाहतूक नियम हे केवळ दंडासाठी नसून मानवी जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत, हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना स्वतः सुरक्षित राहण्याबरोबरच इतरांच्याही जीवाची जबाबदारी आपलीच आहे, ही जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील काणेकर अध्यक्षस्थानी होते.
कार्यशाळेत चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी थोडक्यात मार्गदर्शन करताना सांगितले की, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई तर होतेच, पण त्याहून मोठे नुकसान म्हणजे कुटुंबाचे व समाजाचे नुकसान होते. त्यामुळे तरुणांनी वाहन चालवताना शिस्त, संयम व नियमांचे पालन अंगीकारले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. र.भा माडखोलकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस. डी. गोरल यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सौ. अर्चना रेळेकर -नाडगोडा यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी देव रवळनाथ मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र किरमटे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला नगरसेवक अमेय सबनीस, डॉ. परशराम गावडे, प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे सचिव अनिल पाटील, रोहन किरमटे, संभाजी देसाई, सौ. मंगल वाके, यु इमॅन्युअल पिंटो, प्रा बाबासाहेब शिंगाडे, प्रा.एस. ए. शेख यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



