राष्ट्रीय

उत्कृष्ट प्रशासन, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा गौरव; चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांचा बीएलओंसह विविध संघटनांकडून सत्कार

उत्कृष्ट प्रशासन, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा गौरव; चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांचा बीएलओंसह विविध संघटनांकडून सत्कार

उत्कृष्ट प्रशासन, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा गौरव; चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांचा बीएलओंसह विविध संघटनांकडून सत्कार

चंदगड, प्रतिनिधी : लोकाभिमुख प्रशासन, सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेली संवेदनशीलता आणि महसूल विभागातील प्रभावी कार्यपद्धतीमुळे चंदगड तालुक्यात वेगळी ओळख निर्माण करणारे तहसीलदार राजेश चव्हाण यांचा महसूल दिनानिमित्त मिळालेल्या ‘उत्कृष्ट तहसीलदार’ पुरस्काराबद्दल चंदगड तालुक्यातील बीएलओ बंधू-भगिनी, महसूल कर्मचारी संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना, तलाठी संघटना व ग्रामसेवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.

महसूल दिनानिमित्त १ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसीलदार राजेश चव्हाण यांना उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित सत्कार सोहळ्यात गडहिंग्लजचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी समन्वय समितीचे अध्यक्ष सदानंद पाटील यांनी प्रास्ताविकातून राजेश चव्हाण यांच्या कार्याचा आढावा घेतला. बीएलओंच्या वतीने ज्येष्ठ माध्यमिक मुख्याध्यापक विश्वनाथ फगरे सर व सदानंद पाटील यांनी सत्कार सोहळा पार पाडला. महसूल विभागाच्या वतीने संतोष पाटील, विठ्ठल शिवनगेकर व गजानन धर्माधिकारी यांनी सत्कार केला तर अंगणवाडी विभागाच्या वतीने माधुरी मातवंडकर आणि इतर सहकारी महिलांनी सत्कार केला.

यावेळी उपस्थित वक्त्यांनी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या प्रशासनातील पारदर्शकता, निर्णयक्षम नेतृत्व आणि सर्वसामान्य नागरिकांबरोबरच अधिकारी-कर्मचारी व बीएलओंना दिल्या जाणाऱ्या सन्मानपूर्ण वागणुकीचा विशेष उल्लेख केला. शासनाच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले. “अधिकारी असूनही माणुसकी जपणारे, सर्वांना समान आदर देणारे आणि सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणारे तहसीलदार म्हणून राजेश चव्हाण यांची ओळख आहे,” अशा भावना वक्त्यांनी व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देताना तहसीलदार राजेश चव्हाण म्हणाले, “हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून महसूल विभागातील सर्व अधिकारी-कर्मचारी, बीएलओ बंधू-भगिनी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या सामूहिक परिश्रमाचे हे यश आहे. सर्वांच्या सहकार्यामुळेच मला हा सन्मान मिळाला असून, यापुढेही नागरिककेंद्रित प्रशासनासाठी अधिक जबाबदारीने कार्य करत राहीन.”

यावेळी बीएलओ प्रमुख निहाल मुल्ला, नायब तहसीलदार महासाकांत देसाई, शशिकांत किल्लेदार यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी, बीएलओ बंधू-भगिनी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मतदार सर्वेक्षण कार्यक्रमात येणाऱ्या अडचणी वरती सखोल चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निहाल मुल्ला यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमातून उत्कृष्ट प्रशासन, सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button