राष्ट्रीय

किणी गावाचे माजी सरपंच, शिक्षणप्रेमी मारुती कुट्रे यांचे निधन; सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

किणी गावाचे माजी सरपंच, शिक्षणप्रेमी मारुती कुट्रे यांचे निधन; सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

किणी गावाचे माजी सरपंच, शिक्षणप्रेमी मारुती कुट्रे यांचे निधन; सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
किणी (ता. चंदगड) : प्रतिनिधी
किणी गावचे माजी सरपंच, शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व तसेच ग्रामविकासासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले मारुती कुट्रे यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८४ वर्षे होते. त्यांच्या निधनामुळे किणी गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
मारुती कुट्रे यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात ग्रामविकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले. किणी गावचे सरपंच म्हणून कार्य करताना त्यांनी विकासाभिमुख निर्णय घेत गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले. लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध, साधी राहणी आणि सेवाभावी वृत्ती यामुळे ते सर्वांच्या मनात आदराचे स्थान निर्माण करून गेले.
ग्रामविकासाबरोबरच त्यांनी शिक्षण क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले. ते मामासाहेब लाड विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. आपल्या सेवाकाळात त्यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली. शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता यामुळे ते विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते.
गावाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. विकासाचा दृष्टिकोन, लोकाभिमुख कार्यपद्धती आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होती.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार संजय कुंट्रे हे त्यांचे सुपुत्र होत.
सोमवारी किणी येथे त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि ग्रामविकास क्षेत्रातील एक अभ्यासू, संयमी व सेवाभावी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button