कोवाड ग्रामस्थांचे जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जस्मीन यांना निवेदन
निकृष्ट दर्जाचे काम, अपूर्ण योजना आणि पाणीपुरवठ्यात अडथळे – चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी

निकृष्ट दर्जाचे काम, अपूर्ण योजना आणि पाणीपुरवठ्यात अडथळे – चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी
कोवाड प्रतिनिधी :
तालुक्यातील कोवाड (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेतील कामांबाबत गंभीर तक्रार करत आज कोवाड येथे चंदगड दौऱ्यावर आलेल्या जिल्हा परिषद कोल्हापुर च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .जस्मीन यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून, अनेक ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली योजना २०२२ पासून राबविण्यात येत आहे. मात्र अद्यापही अनेक कुटुंबांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
तसेच, अनेक ठिकाणी पाईपलाईन उघडी पडलेली असून, दुरुस्तीचे काम वेळेवर होत नसल्यामुळे पाण्याची नासाडी होत आहे. काही भागांमध्ये पाणीपुरवठा अनियमित असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामस्थांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, संबंधित कामांचे योग्य प्रकारे निरीक्षण झाले नसून, कामाचा दर्जा तपासण्यासाठी स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. तसेच दोषी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करून काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत ग्रामस्थांनी गुणवत्ता तपासणी (Quality Audit) करण्याचीही मागणी केली असून, पारदर्शक पद्धतीने चौकशी करून गावकऱ्यांना न्याय द्यावा, असे आवाहन केले आहे.
सदर निवेदन प्रकरणी प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.




