राष्ट्रीय

चंदगडमध्ये महिला डॉक्टरवर हल्ला; डॉक्टर असोसिएशनकडून तीव्र निषेध, कठोर कारवाईची मागणी*

चंदगडमध्ये महिला डॉक्टरवर हल्ला; डॉक्टर असोसिएशनकडून तीव्र निषेध, कठोर कारवाईची मागणी*

*चंदगडमध्ये महिला डॉक्टरवर हल्ला; डॉक्टर असोसिएशनकडून तीव्र निषेध, कठोर कारवाईची मागणी*

चंदगड, दि. २२ एप्रिल : तालुक्यातील तुर्कवाडी येथे एका महिला डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात तसेच समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा डॉक्टर असोसिएशन चंदगडने तीव्र शब्दांत निषेध नोंदवित संबंधित आरोपींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कवाडी येथील महिला डॉक्टर डॉ. प्रणाली कोषल बांदिवडेकर यांच्यावर त्यांच्या सहकाऱ्यांपैकी काही व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. हा हल्ला केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रावर आणि समाजातील महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे डॉक्टर असोसिएशनने आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
या घटनेमुळे डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचेही असोसिएशनने स्पष्ट केले आहे. डॉक्टर असोसिएशन चंदगडच्या वतीने पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे प्रभावीपणे राबविणे आणि त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती उपाययोजना तातडीने करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
पीडित महिला डॉक्टरला योग्य वैद्यकीय, मानसिक तसेच कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याची मागणीही असोसिएशनने केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक तो आधार देण्यात यावा, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
डॉक्टर असोसिएशनने प्रशासनाकडे मागणी करताना स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना आखण्यात याव्यात.
दरम्यान, या निवेदनावर डॉक्टर असोसिएशन चंदगडचे अध्यक्ष डॉ. निवृत्ती गुरव, उपाध्यक्ष डॉ. सुहास धाबळे, सचिव डॉ. ज्योती फागरे आणि खजिनदार डॉ. सुभाष पाटील यांच्या स्वाक्षऱ्या असून, या घटनेबाबत सर्व स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button