कामेवाडी धरणाचे पाणी स्थानिक गावांसाठी अडवा; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा
पंचायत समिती सदस्या सुवर्णा कुंभार यांचे पाटबंधारे विभागाला निवेदन

कामेवाडी धरणाचे पाणी स्थानिक गावांसाठी अडवा; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवा
पंचायत समिती सदस्या सुवर्णा कुंभार यांचे पाटबंधारे विभागाला निवेदन
कोवाड, प्रतिनिधी :
कामेवाडी ते माणगाव परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची दखल घेत पंचायत समिती सदस्या सौ. सुवर्णा चंद्रकांत कुंभार यांनी पाटबंधारे विभागाच्या विभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून कामेवाडी बंधाऱ्याचे पाणी स्थानिक गावांसाठी अडविण्याची मागणी केली आहे. या निवेदनामुळे परिसरातील नागरिकांच्या पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या कामेवाडी ते माणगाव परिसरात उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे आणि पाण्याच्या टंचाईमुळे नागरिक, महिला तसेच जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कामेवाडी बंधाऱ्याचे पाणी योग्य नियोजनाअभावी पुढे वाहून कर्नाटक राज्याच्या दिशेने जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हेच पाणी वेळेत आणि योग्य पद्धतीने अडविल्यास ते स्थानिक गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे कामेवाडी ते माणगाव परिसरातील अनेक गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या विषयात आमदार शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील ग्रामस्थांनीही प्रशासनाकडे सकारात्मक भूमिका घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पाटबंधारे विभागाने या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करून कामेवाडी बंधाऱ्याचे पाणी अडवावे व स्थानिक नागरिकांना त्यांच्या हक्काचे पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
यासंदर्भात प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन योग्य उपाययोजना कराव्यात, जेणेकरून दरवर्षी उद्भवणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल, अशी अपेक्षा पंचायत समिती सदस्या सौ. सुवर्णा चंद्रकांत कुंभार यांनी आपल्या निवेदनातून व्यक्त केली आहे.




