माजी आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन हलकर्णी फाटा व नागणवाडी येथे रविवारी विविध सामाजिक उपक्रम; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
माजी आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन हलकर्णी फाटा व नागणवाडी येथे रविवारी विविध सामाजिक उपक्रम; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन

चंदगड, प्रतिनिधी :
चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा चंदगड तालुका खरेदी-विक्री सहकारी संघाचे चेअरमन राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 14) विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराद्वारे नागरिकांची सेवा करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने हलकर्णी फाटा येथील तालुका संघाच्या पेट्रोल पंप सभागृहात सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये परिसरातील युवक, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू रुग्णांसाठी रक्ताचा साठा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याचबरोबर आमदार राजेश पाटील युवा मंच आणि बेळगाव येथील लोटस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नागणवाडी सेवा संस्था सभागृहात सकाळी 9 वाजता मोफत हाडांचे तपासणी व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे.
शिबिरामध्ये पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, सायटिका तसेच मणक्यांशी संबंधित विविध आजारांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच मधुमेहींना होणाऱ्या पायांच्या समस्या, पायात मुंग्या येणे, जळजळ होणे, सुन्नपणा आदी तक्रारींवरही मोफत तपासणी व सल्ला दिला जाणार आहे. आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.
माजी आमदार राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेले हे सामाजिक उपक्रम नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासह समाजोपयोगी कार्याला चालना देणारे ठरणार आहेत. परिसरातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा तसेच रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.




