राष्ट्रीय
कोवाड ग्रामसभेतील आरोपांची चौकशी करा; ग्रामसेवकाच्या बदलीची मागणी
कोवाड ग्रामसभेतील आरोपांची चौकशी करा; ग्रामसेवकाच्या बदलीची मागणी

- कोवाड ग्रामसभेतील आरोपांची चौकशी करा; ग्रामसेवकाच्या बदलीची मागणी
चंदगड प्रतिनिधी
कोवाड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर करण्यात आलेले आरोप खोटे व बिनबुडाचे असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच ग्रामसभेत चुकीची माहिती व दिशाभूल करणारी आकडेवारी सादर करणाऱ्या ग्रामसेवकाची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत कोवाडच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बुधवार (दि. ३ जून) रोजी कोवाड येथील हनुमान मंदिरात ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर गलथान कारभार केल्याचे आरोप करण्यात आले. हे आरोप वस्तुस्थितीविरुद्ध असून ग्रामपंचायतीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
तसेच ग्रामसभेदरम्यान महिला सरपंच सौ. अनिता कल्लाप्पा भोगण यांना एकेरी भाषेत संबोधून त्यांचा अवमान करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. ग्रामसभा संपल्यानंतर ग्रामसेवकांवर दबाव आणून व दमदाटी करून वस्तुस्थितीविरुद्ध ठराव मंजूर करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
ग्रामसेवकांनी ग्रामसभेत चुकीची व दिशाभूल करणारी माहिती तसेच खोटी आकडेवारी सादर केल्यामुळे गावातील वातावरण दूषित झाले असून ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामसेवकाच्या कामकाजाची चौकशी करून त्यांची तात्काळ बदली करावी व त्यांच्या जागी सक्षम व जबाबदार ग्रामविकास अधिकारी अथवा ग्रामविस्तार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
ग्रामसभेचा संपूर्ण वृत्तांत व इतिवृत्त मागवून निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हे निवेदन सरपंच सौ. अनिता कल्लाप्पा भोगण, उपसरपंच श्री. व्हण्याळकर तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती चंदगड यांच्याकडे सादर केले आहे. या निवेदनामुळे कोवाड ग्रामपंचायतीतील वादाला नवे वळण मिळाले असून तालुक्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.




