अतिदुर्गम बिदरमाळ धनगरवाड्यास पालकमंत्री प्रकाश आबिटकर व आमदार शिवाजी पाटील यांची भेट*
अतिदुर्गम बिदरमाळ धनगरवाड्यास पालकमंत्री प्रकाश आबिटकर व आमदार शिवाजी पाटील यांची भेट*

- *अतिदुर्गम बिदरमाळ धनगरवाड्यास पालकमंत्री प्रकाश आबिटकर व आमदार शिवाजी पाटील यांची भेट*
चंदगड प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील अतिदुर्गम आणि डोंगराळ भागातील बिदरमाळ धनगरवाड्यास महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रकाशजी आबिटकर साहेब यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. शिवाजी पाटील (भाऊ) यांच्या समवेत भेट देत ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या.
बिदरमाळ हा चंदगड तालुक्यातील दुर्गम भागातील धनगरवाडा असून येथे मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव असल्याचे ग्रामस्थांनी मान्यवरांच्या निदर्शनास आणून दिले. पिण्याच्या पाण्याची समस्या, खराब रस्ते, आरोग्य सुविधांचा अभाव, शिक्षणाच्या अडचणी तसेच वनक्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न ग्रामस्थांनी यावेळी मांडले.
ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्यानंतर पालकमंत्री प्रकाशजी आबिटकर यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार शिवाजी पाटील (भाऊ) यांनीही बिदरमाळसह परिसरातील धनगरवाड्यांवरील नागरिकांच्या अडचणी शासन दरबारी सातत्याने मांडल्या जात असून या भागाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. “दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा विश्वास यावेळी मान्यवरांनी ग्रामस्थांना दिला.
या भेटीदरम्यान महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री मा. श्री. भरमुअण्णा पाटील साहेब, प्रांताधिकारी मा. श्री. एकनाथ काळबांडे, तहसीलदार श्री. राजेश चव्हाण, गट विकास अधिकारी वृषाली यादव, पोलीस निरीक्षक चौखंडे, वनाधिकारी शितल पाटील, पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदिवडेकर, चंदगड नगरपंचायत नगराध्यक्ष सुनील काणेकर तसेच विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीमुळे बिदरमाळ धनगरवाड्यावरील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून शासन स्तरावरून लवकरच ठोस उपाययोजना होतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.




