गव्याच्या हल्ल्यात दुंडग्याचे गणपती कोकितकर गंभीर जखमी
गव्याच्या हल्ल्यात दुंडग्याचे गणपती कोकितकर गंभीर जखमी





कोवाड, ता. २० ः दुंडगे (ता. चंदगड) येथे गव्याच्या हल्ल्यात ऊस तोडणी मजूर गंभिर जखमी झाला. गणपती जोतिबा कोकितकर (वय,५५) असे जखमी शेतकऱ्याचे नांव आहे. गव्याने अचानकपणे पाठीमागून हल्ला केला. कोकितकराना शिंगावर घेऊन हवेत फेकल्याने त्यांच्या मांडीत शिंग शिरुन ते गंभिर जखमी झाले आहेत. सायंकाळी चार वाजता व्हंडा नावाच्या शेतात ही घटना घडली. जखमीवर कोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करुन पुढील उपचारासाठी सायंकाळी गडहिंग्लजला पाठविण्यात आले. वनविभागाचे पाटणे सर्कलचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे, वनपाल जे. आर. डिसोझा यांनी जखमीची विचारपूस करुन घटनास्थळी पाहणी करुन पंचनामा केला.
गणपती कोकितकर हे ऊस तोडणीचे काम करतात. आज त्यांच्याच मालकीच्या ऊस तोडणीचे काम सुरु होते. ऊसाच्या फडात अन्य १५ तोडणी मजूर ऊस तोडणीचे काम करत होते. सायंकाळी चार वाजता ऊस तोडणी काम थांबवून ते शिल्लक ऊस बघण्यासाठी शेताच्या बांधावरुन पाठीमागच्या बाजूला जात होते. दरम्यान शेजारच्या शेताच्या बांधाखाली लपून बसलेल्या गव्याने अनाचक कोकितकरांच्यावर पाठीमागून हल्ला केला. शिंगावर घेऊन त्याना पाच फुट उंच हवेत फेकले. त्यांच्या मांडीत शिंग शिरल्याने ते गंभिर जखमी झाले. गव्याने अचानक केलेल्या हल्ल्याने कोकितकर ओरडत जमिनीवर पडले. सर्वांच्या डोळ्यासमोर हा प्रसंग घडल्याने अन्य शेतकरी भयभीत झाले. भिथरलेल्या गव्याने त्यानंतर जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कोकितकराना शेतकऱ्यानी तात्काळ कोवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. गव्याच्या हल्ल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे शेतातून काम करणारे शेतकरी भितीपोटी काम अर्धवट सोडून घरी निघून गेले. सायंकाळी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे, वनपाल जे. आर. डिसोझा यांनी जखमी शेतकऱ्यांची आरोग्य केंद्रात भेट घेऊन माहिती घेतली. घटनास्थळी जाऊन त्यानी पंचनामा केला व वनविभागाच्यावतीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
----------------------------