कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा सुरक्षित ठेवा; आमदार शिवाजीराव पाटील यांची मागणी*
कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा सुरक्षित ठेवा; आमदार शिवाजीराव पाटील यांची मागणी*

*कोरड्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा सुरक्षित ठेवा; आमदार शिवाजीराव पाटील यांची मागणी*
चंदगड : ऐन पावसाळ्यात गेल्या जवळपास एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांत भविष्यात पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठ्याचे आतापासूनच योग्य नियोजन करून धरणे व बंधाऱ्यांमधील पाणी सुरक्षित ठेवावे, अशी मागणी आमदार श्री. शिवाजीराव पाटील (भाऊ) यांनी केली आहे.
चंदगड, गडहिंग्लज व आजरा हे तालुके प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहेत. मात्र, ऐन पावसाळ्यात पावसाने दीर्घकाळ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी उभ्या पिकांना आवश्यक पाणी मिळण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून, आगामी काळात पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध असलेल्या प्रत्येक पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
चंदगड व आजरा तालुके अधिक पर्जन्यमान असलेल्या पश्चिम भागात येतात, तर गडहिंग्लज तालुक्याचा मोठा भाग मध्यम पर्जन्यमान क्षेत्रात येतो. या तिन्ही तालुक्यांतील विविध सिंचन प्रकल्प, धरणे, लघु-मध्यम पाटबंधारे प्रकल्प आणि बंधारे शेती व पिण्याच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.
त्यामुळे चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील सर्व संबंधित धरणे व बंधाऱ्यांच्या सद्यस्थितीचा तातडीने आढावा घेऊन, सुरक्षितता, मंजूर जलनियोजन आणि तांत्रिक बाबींचा विचार करून ज्या ठिकाणी शक्य आहे, तेथे दरवाजे तातडीने बंद करून वाहून जाणारे पाणी अडवावे. उपलब्ध पाणीसाठा जास्तीत जास्त सुरक्षित ठेवून त्याचा पिण्यासाठी , शेतीसाठी आणि जनावरांसाठी पाण्यासाठी प्राधान्याने उपयोग होईल, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आमदार शिवाजीराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आगामी काळात पाऊस आणखी लांबल्यास पाण्याची परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे संभाव्य टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आतापासूनच खबरदारी घेणे आवश्यक आहे. धरणे व बंधाऱ्यांतील पाण्याचा अनावश्यक विसर्ग होणार नाही याची दक्षता घेऊन उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे, अशी भूमिका आमदार पाटील यांनी मांडली आहे.
“शेतकऱ्यांच्या पिकांसाठी आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच योग्य नियोजन करावे आणि शक्य तिथे धरणे व बंधाऱ्यांचे दरवाजे बंद करून पाणीसाठा सुरक्षित ठेवावा,” असे आमदार शिवाजीराव पाटील (भाऊ) यांनी सांगितले.




