राष्ट्रीय

मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती व अभिमान आहे* – प्राचार्य आर. पी. पाटील

मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती व अभिमान आहे* – प्राचार्य आर. पी. पाटील

*मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती व अभिमान आहे* – प्राचार्य आर. पी. पाटील

*न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा*

चंदगड :
येथील दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. संपूर्ण परिसर मराठी भाषेच्या गजराने आणि कुसुमाग्रजांच्या कवितांनी दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन करून मराठी भाषेच्या जतन-संवर्धनाचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. पी. पाटील होते.
प्रमुख वक्ते उपप्राचार्य व्ही. एन. कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले, “भाषा हे दोन मने जोडण्याचे प्रभावी माध्यम आहे. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. मराठी भाषा आपली ओळख आहे.” त्यांच्या विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये भाषाभिमानाची जाणीव अधिक दृढ झाली.
प्रा. निळकंठ यांनी मराठी साहित्याचा गौरव करत कुसुमाग्रजांच्या निवडक कवितांचे प्रभावी वाचन केले. त्यांच्या काव्यवाचनाला विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. सौ. विद्या डोंगरे यांनी मनोगत व्यक्त करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.
शाळेचे ग्रंथपाल शरद हदगल यांनी कुसुमाग्रज यांच्या साहित्यकृतींचे आकर्षक पुस्तक प्रदर्शन भरविले होते. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध पुस्तकांची माहिती जाणून घेतली. तसेच विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील कुसुमाग्रजांच्या कवितांचे काव्यगायन सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य आर. पी. पाटील म्हणाले, “मराठी भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती आपली संस्कृती, परंपरा आणि अभिमान आहे. आपल्या बोलण्यातून, लेखनातून आणि दैनंदिन व्यवहारातून आपण मराठी जागवली पाहिजे. मराठीचा सन्मान म्हणजे आपल्या अस्तित्वाचा सन्मान आहे.”
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संजय साबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शरद हदगल यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेबद्दल अभिमान, जिव्हाळा आणि साहित्यप्रेम अधिक वृद्धिंगत झाल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button