चंदगड तालुक्यात कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बंद ठेवण्याचा इशारा; पदाधिकाऱ्यांची बैठक
चंदगड तालुक्यात कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बंद ठेवण्याचा इशारा; पदाधिकाऱ्यांची बैठक

चंदगड तालुक्यात कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बंद ठेवण्याचा इशारा; पदाधिकाऱ्यांची बैठक
चंदगड : प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित अडचणींकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ चंदगड तालुका रासायनिक खते व कीटकनाशके विक्रेते असोसिएशनच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्री केंद्रे बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बैठकीत विक्रेत्यांच्या व्यवसायातील वाढत्या अडचणी, नियमांमधील गुंतागुंत, तसेच प्रशासनाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली.
तसेच, राज्यभरातील संघटनांनी घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यातही एकजुटीने भूमिका घेण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी प्रशासनाला निवेदन देऊन परिस्थितीची जाणीव करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस अध्यक्ष सचिन पाटील, वसंत पाटील, मनोहर पाटील, रामचंद्र बामणे, संदीप कोकरेकर, नारायण गिलबिले, सुभाष चव्हाण, सौरभ कोले, लक्ष्मण बंबरगेकर व विलास पाटील हे उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी, “शेतकऱ्यांना वेळेवर व योग्य दरात कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी विक्रेत्यांच्या अडचणी दूर करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा येणाऱ्या काळात याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात,” असा इशाराही देण्यात आला.




