राष्ट्रीय

कोवाड मर्चंट पतसंस्थेला ३२ लाख ५१ हजारांचा नफा; सभासदांना १५ टक्के लाभांश

२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववानांचा गौरव

कोवाड मर्चंट पतसंस्थेला ३२ लाख ५१ हजारांचा नफा; सभासदांना १५ टक्के लाभांश
२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववानांचा गौरव
कोवाड : प्रतिनिधी
दि कोवाड मर्चंट ग्रा. बि. शेती सह. पतसंस्था मर्या., कोवाड या संस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री. दयानंद नारायण मोटुरे होते. संचालक श्री. बी. के. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर संचालक श्री. रवि मारुती पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली.
चेअरमन श्री. दयानंद मोटुरे यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेतला. अहवाल सालामध्ये संस्थेला ३२ लाख ५१ हजार २५० रुपयांचा नफा प्राप्त झाला असून, सभासदांना १५ टक्के लाभांश व दीपावली भेटवस्तू देण्याची घोषणा त्यांनी केली. सभासदांनी संस्थेवर विश्वास ठेवून अधिकाधिक ठेवी ठेवाव्यात तसेच संस्थेकडून कर्ज घेऊन संस्थेची आर्थिक उलाढाल वाढविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थेकडून ९ टक्के व्याजदराने सोनेतारण कर्ज, १२ टक्के व्याजदराने वाहन तारण कर्ज, तर इतर कर्जे १३ टक्के व्याजदराने सरळव्याजाने दिली जात असल्याची माहिती श्री. मोटुरे यांनी दिली. चालू आर्थिक वर्षात सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी १२ टक्के व्याजदराने ‘सुकन्या योजना’ सुरू करण्यात येत असून, सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. उत्तमराव मुळीक यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे कार्यक्षेत्र वाढविणे, शाखा विस्तार तसेच इमारतीच्या वाढीव बांधकामाबाबत सभासदांना माहिती दिली. सभासदांनी सावकारी कर्ज तसेच खासगी फायनान्स कंपन्यांच्या प्रलोभनाला बळी न पडता आपल्या संस्थेत विश्वासाने व्यवहार करावेत, असे आवाहन त्यांनी केले. सभासदांच्या कर्जावर विमा उतरवून कर्जदारांसह संस्थेला दिलासा देणारी ही एकमेव संस्था असल्याचे सांगत, भविष्यात संस्थेला आणखी उभारी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
संस्थेचे कायदेशीर सल्लागार व जीएसटी अधिकारी श्री. विजय प्रधान यांनी संस्थेच्या कायदेशीर बाबींची माहिती सभासदांना दिली. अहवाल सालामध्ये संस्थेच्या ठेवींमध्ये २ कोटी ५६ लाख रुपयांची वाढ, तर कर्जांमध्ये १ कोटी ८३ लाख रुपयांची वाढ झाली आहे. तसेच संस्थेची गुंतवणूक १ कोटी ३ लाख रुपयांनी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेची कायदेशीरदृष्ट्या चांगल्या प्रकारे वाटचाल सुरू असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
संस्थेचे लेखापरीक्षक श्री. सुरेश घाटगे यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेचे सभासद तसेच भागभांडवल वाढविण्याचा सल्ला त्यांनी दिला. संस्थेचे सर्व व्यवहार तपासले असता संस्थेने कायदेशीर बाबी व नियमांचे पालन करून कामकाज केल्याचे निदर्शनास आले असून, संस्था निश्चितच यशाचे सर्वोच्च शिखर गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववानांचा गौरव
वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने दहावी व बारावीमध्ये उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करून चंदगड तालुक्याच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि राज्यात तालुक्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला.
यामध्ये कालकुंद्री येथील श्रीमती तेजस्विनी मारुती पाटील यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. चंदगड तालुक्यातील पहिल्या महिला उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांच्या निवडीचा गौरव करण्यात आला.
डॉ. किरण सुबराव बिर्जे यांनी एम.डी. पदवी संपादन केल्याबद्दल, श्री. ओंकार महेश हल्याळी यांनी आयआयटी मद्रास येथून मास्टर पदवी प्राप्त केल्याबद्दल तसेच श्री. सुशांत अर्जुन मुतकेकर यांची भारत सरकारच्या गृह मंत्रालयातील गुप्तचर विभागात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कुमारी जान्हवी पांडुरंग मोहनगेकर हिची राष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल, तसेच कुमार जय पांडुरंग मोहनगेकर याची तलवारबाजी (गतका) या क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल गौरव करण्यात आला.
श्री. अशोक नौकुडकर सर यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच श्री. दिनेश मुर्डेकर यांना ‘ऑरगॅनिक भारताचे शिल्पकार’ पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरवचिन्ह व प्रेमाची शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व सत्कारमूर्तींना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. एम. जे. पाटील अण्णा व श्री. अर्जुन मुतकेकर यांनी मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. सभेच्या कामकाजादरम्यान श्री. आप्पा वांद्रे, श्री. पुंडलिक पाटील व श्रीकांत पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.
सभेसाठी संस्थेचे मुख्य प्रवर्तक श्री. महमदशाकीर काझी, संचालक श्री. बाळासाहेब वांद्रे, श्री. विरुपाक्ष गणाचारी, श्री. विष्णू गावडे (नाना), श्री. राणबा तोगले, श्री. कल्लाप्पान्ना वांद्रे, श्री. के. वाय. कांबळे, सौ. मनिषा पाटील व सौ. गीतांजली अंगडी यांच्यासह संस्थेचे सभासद उपस्थित होते.
सभेची नोटीस व इतिवृत्त वाचन सौ. श्रद्धा कोकीतकर यांनी केले, तर अहवाल वाचन संस्थेचे मॅनेजर श्री. मनोहर पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्राची पाटील यांनी केले. आभार स्वीकृत संचालक श्री. श्रीधर भोगण यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button