हलकर्णीत ‘चंद्रकला करंडक’ राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा
५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना सहभागाची संधी; विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह

हलकर्णीत ‘चंद्रकला करंडक’ राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा
५ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना सहभागाची संधी; विजेत्यांना रोख पारितोषिकांसह सन्मानचिन्ह
हलकर्णी / प्रतिनिधी …हलकर्णी, ता. गडहिंग्लज : श्रीमती चंद्राबाई कल्लापा म्हेत्री मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट, हलकर्णी आणि हलकर्णी भाग शिक्षण प्रसारक मंडळ, हलकर्णीच्या हलकर्णी भाग हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चंद्रकला करंडक राज्यस्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हलकर्णी भाग हायस्कूलच्या सांस्कृतिक सभागृहात होणार आहे.
आजच्या विविध सामाजिक प्रश्नांवर विद्यार्थ्यांमध्ये विचारमंथन व्हावे, तसेच विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर निर्भीड आणि सडेतोड विचार मांडावेत, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
इयत्ता ५ वी ते ८ वी या गटासाठी ‘जीवन सुंदर आहे’, ‘मोबाईल वरदान की शाप?’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षण’, ‘गौतम बुद्धांचे विचार आणि आजची पिढी’ आणि ‘भारतीय संविधान : माझा अभिमान’ हे विषय देण्यात आले आहेत. या गटासाठी भाषणाची वेळ ५ ते ७ मिनिटे आहे.
इयत्ता ९ वी ते १२ वी या गटासाठी ‘भारतीय संविधान : लोकशाहीचा आत्मा’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि आजचा भारत’, ‘आजची तरुणाई आणि भारताचे भविष्य’, ‘सोशल मीडिया : साधन की व्यसन?’ आणि ‘गांधी विचार आणि आजचा भारत’ हे विषय आहेत. या गटासाठी ७ ते ९ मिनिटे वेळ देण्यात येणार आहे.
दोन्ही गटांमध्ये प्रथम क्रमांकासाठी ५ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी ४ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी ३ हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच उत्तेजनार्थ १ हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विविध मान्यवरांच्या स्मरणार्थ ही पारितोषिके पुरस्कृत करण्यात आली आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेची प्रवेश फी ५ वी ते ८ वी गटासाठी ५० रुपये, तर ९ वी ते १२ वी गटासाठी १०० रुपये आहे. एका शाळेतून तीन स्पर्धक सहभागी होऊ शकतात. स्पर्धकांनी दि. १५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नावनोंदणी करावी. स्पर्धेसाठी येताना मुख्याध्यापकांचे शिफारसपत्र, वैयक्तिक ओळखपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच आपल्या भाषणाची एक स्वच्छ प्रत नावनोंदणीच्या वेळी संयोजकांकडे जमा करावी लागणार आहे.
स्पर्धकांनी आपला प्रवास खर्च स्वतः करायचा असून आयोजकांकडून दुपारचे जेवण व चहाची मोफत व्यवस्था करण्यात येणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. कोणतेही पारितोषिक विभागून दिले जाणार नाही.
स्पर्धेसाठी प्रा. डॉ. किशोर कल्लापा म्हेत्री हे स्पर्धा समन्वयक म्हणून काम पाहत असून नावनोंदणी व अधिक माहितीसाठी ९४२२३७३३६१ या क्रमांकावर संपर्क साधावा. सचिव प्रा. डॉ. अनिल आनंदा शिर्के, सहा. समन्वयक सौ. स्वाती गुरुनाथ पोतदार व श्री. सोमनाथ गंगाराम खानापुरे यांच्या सहकार्याने स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर कल्लापा म्हेत्री, सचिव प्रा. डॉ. अनिल आनंदा शिर्के, खजिनदार श्री. रामलिंग मारुती दुध्यागोळ तसेच हलकर्णी भाग हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. कलगोंडा बाळगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा होणार आहे.
‘अत्त दीपो भव’ या प्रेरणादायी विचारातून विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याला आणि सामाजिक जाणिवेला व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. डॉ. किशोर कल्लापा म्हेत्री आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री कलगोंडा पाटील यांनी केले आहे.




