“२५ वर्षांची प्रतीक्षा संपली! खालसा कोळिंद्रेचा बंद रस्ता खुला; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे ग्रामस्थांकडून आभार”
"२५ वर्षांची प्रतीक्षा संपली! खालसा कोळिंद्रेचा बंद रस्ता खुला; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे ग्रामस्थांकडून आभार"

चंदगड /प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील खालसा कोळिंद्रे (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथील तब्बल २५ वर्षांपासून बंद असलेला महत्त्वाचा रस्ता खुला करून देत ग्रामस्थांना दिलासा देणारे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन ग्रामस्थांच्या वतीने शिवसेना महाराष्ट्र बांधकाम उद्योग सेना अध्यक्ष प्रशांत अनगुडे यांनी आभार व्यक्त केले.
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या प्रश्नामुळे परिसरातील नागरिकांना दैनंदिन प्रवास, शेतीची कामे, विद्यार्थ्यांची ये-जा तसेच आपत्कालीन सेवांमध्ये मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक वर्षे विविध स्तरावर पाठपुरावा करूनही हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. मात्र पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रशासनाशी समन्वय साधत रस्ता खुला करण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर मुंबई येथील शासकीय निवासस्थानी झालेल्या भेटीत प्रशांत अनगुडे यांनी खालसा कोळिंद्रे ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री आबिटकर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. यावेळी तालुक्यातील विविध विकासकामांबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, “चंदगड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, प्रलंबित प्रश्नांना प्राधान्याने न्याय देत विकासकामांना गती दिली जाईल,” असे आश्वासन दिले.
ग्रामस्थांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल पालकमंत्री आबिटकर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत, भविष्यातही तालुक्यातील विकासकामांना अशीच गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.




