भडगाव पुलाचे काम २१ तारखेपर्यंत पूर्ण होणार; २१ ते २८ जुलै दरम्यान वाहतूक सुरळीत होणार – आमदार शिवाजीराव पाटील*
भडगाव पुलाचे काम २१ तारखेपर्यंत पूर्ण होणार; २१ ते २८ जुलै दरम्यान वाहतूक सुरळीत होणार – आमदार शिवाजीराव पाटील*

*भडगाव पुलाचे काम २१ तारखेपर्यंत पूर्ण होणार; २१ ते २८ जुलै दरम्यान वाहतूक सुरळीत होणार – आमदार शिवाजीराव पाटील*
*भडगाव, प्रतिनिधी :*
भडगाव येथील नवीन पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून, उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. पर्यायी पुल वाहून गेल्यामुळे भडगावसह परिसरातील नागरिक, शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि नोकरदार वर्गाला मोठ्या प्रमाणावर गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी स्वतः या कामाचा आढावा घेतला तसेच संबंधित शासकीय अधिकारी व ठेकेदारांना काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांनी पुलाचे उर्वरित काम वेगाने सुरू असून २१ ते २८ जुलैदरम्यान पुलावरील वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती आमदार पाटील यांना दिली. कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देशही आमदार पाटील यांनी दिले.
दरम्यान, पुलाचे काम सुरू असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार पाटील यांनी गडहिंग्लज बस आगार व चंदगड बस आगार व्यवस्थापकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. विद्यार्थी, रुग्ण आणि प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी बोलताना आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, “भडगाव पुलाच्या कामामुळे नागरिकांना आणखी काही दिवस गैरसोय सहन करावी लागणार असली, तरी त्यानंतर हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी थोडा संयम बाळगावा. प्रशासन आणि संबंधित यंत्रणा पुलाचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.”
ते पुढे म्हणाले की, दरवर्षी पावसाळ्यात हिरण्यकेशी नदीला पूर आल्यामुळे भडगाव परिसरातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होत होती. यामुळे नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या माध्यमातून नवीन पुलासाठी मंजुरी मिळवून दिली. आता हा पूल पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यातील वाहतूक कोंडी आणि संपर्क तुटण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असून, संपूर्ण परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भडगाव पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, येत्या काही दिवसांत पुलावरून वाहतूक सुरू होण्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर भडगावसह परिसरातील अनेक गावांचा संपर्क अधिक सुरक्षित, जलद आणि अखंड राहणार असून, वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.




